वारली संस्कृतीचे चित्रांद्वारे साकार केलेले रूप व त्याचे भरतनाट्यम पद्धतीने सादरीकरण केलेले आदिवासी नृत्य पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नाते व ते जपण्यासाठी आवश्यक प्रयत्न या संदर्भात अनोखा नृत्यनाट्य कार्यक्रम 'जेव्हा भिती नाचतात' याचे आयोजन पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. वारली संस्कृती, आदिवासी समाजातील जन्मापासूनचे काही प्रसंग हे बोहाडा या पारंपरिक आदिवासी नृत्य व भरतनाट्यम नृत्य यांची गुंफण करून अनोखा नृत्यनाट्य प्रकार सादर करण्यात आला. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नाते व ते जपण्यासाठीआवश्यक प्रयत्न या संदर्भात 'जेव्हा भिंती नाचतात' या कार्यक्रमाचे आयोजन केले. एका वारली समाजातील मुलीच्या जन्माच्या निमित्ताने लावलेले चाफ्याचे झाड (चंपा) व त्यानंतर मुलीची या झाडाशी झालेली घट्ट मैत्री असा कथानक रंगवून मुलीच्या जन्मापासून, शिक्षण, लग्न व त्यानंतरचा प्रवास अधोरेहित करण्यात आला आहे. याखेरीस आदिवासी संस्कृती, शेती व पर्यावरणाशी निगडित समस्या वारली चित्र व त्यांचे अॅनिमेशन द्वारे चित्रित करताना त्याला वारली पारंपारिक संगीत गीत व भरतनाट्यम नृत्याची जोड देण्यात आली. त्यामुळेच या कलाविष्काराला 'जेव्हा भिती नाचतात' असे संबोधण्यात आले. कैशीकाही नृत्यशाळा या लोकनृत्याचा प्रसार करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती व नृत्य प्रस्तुती पालघर प्राची सावे साथी यांनी केली. या कार्यक्रमामधील ॲनिमेशन उपासना राव यांनी केले होते. तर संगीत हे स्वप्निल चाफेकर यांचे होते. सतीश कृष्णमूर्ती व वारली समाजातील गायक वादक यांची साथ तसेच स्वप्निल चाफेकर व राजेंद्र चौधरी यांची गीत रचना व स्वप्निल चाफेकर व केतकी भावे यांचे गायन यामुळे हा कार्यक्रम बहरला. हे नृत्यनाट्य पाहण्यासाठी मान व माहीम येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी, पालघर येथील मुलींच्या आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थिनी तसेच पालघर येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.