सोमवारी जिल्ह्यात घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला गेला. मात्र वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणीही ज्येष्ठ नागरिक, तसेच मुलांनी रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून विरारच्या बोळींज परिसरात श्रीहास चुरी यांच्या आयईसीए फाउंडेशनच्या श्री पुरुष वृद्धाश्रमात सोमवारी सकाळी महिला कर्मचाऱ्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाने व उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. त्याचप्रमाणे वसई पारनाका येथील लॅरिसा घोन्सालविस चालवित असलेल्या लोगोस चॅरिटेबल ट्रस्टच्या वृद्धाश्रमात आजींनी आजोबांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. वसईच्या वर्तक वेल्फेअर फाउंडेशनही काही कुटुंबांना दत्तक घेऊन अनेक गरीब मुलांची काळजी घेत असते. वसईच्या पापडी परिसरातील लोया नगर येथे राहणाऱ्या अनेक गरीब मुलांना लागणारे शालेय वस्तू, फूड वाटप करत असते. त्यामुळे दरवर्षी ही मुले या संस्थेच्या संस्थापक आणि समाजसेविका अभिलाषा वर्तक यांना राखी बांधतात.