भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या प्रतिष्ठित “बोर्ड ऑफ ट्रेड” वर श्री. निमिष अशोक सावे यांची सदस्य (Member) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग, कृषी आणि व्यापार क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड केली आहे. उत्तर कोकणातील उद्योजक, शेतकरी, MSME क्षेत्र, निर्यातदार आणि युवा उद्योजकांना सक्षम करण्यासाठी श्री. सावे यांनी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. उद्योग आणि कृषी क्षेत्राचा सखोल अभ्यास, दूरदृष्टी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. सावे यांची ही नियुक्ती केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर उत्तर कोकण, महाराष्ट्र आणि देशाच्या उद्योग–व्यापार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग देशाच्या व्यापार धोरणांना अधिक बळकटी देण्यासाठी होईल, तसेच ‘विकसित भारत @2047’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. निमिष अशोक सावे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.