माहीम येथील खो-खो खेळाडू व पंच रोहन धनेश सावे यांनी राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज, दि. १० जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित पालघर जिल्हा क्रीडा परिषदेच्या शिबिरात, मा. खासदार श्री. हेमंत सावरा यांच्या हस्ते रोहन सावे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रोहन सावे यांनी दि. ५ जून २०२६ रोजी सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत राष्ट्रीय पंच म्हणून मान्यता प्राप्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे. या यशामागे पालघर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सहकारी पंच, पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे रोहन सावे यांनी यावेळी नमूद केले. रोहन सावे यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, राष्ट्रीय पंच म्हणून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.