सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळ, माहीमच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी श्री महेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंडळाच्या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून परिसरात २५ वृक्षांची रोपे लावण्यात आली. या उपक्रमास माहीम गावच्या सरपंच सौ. प्रीती अरुण पाटील, मंडळाचे विश्वस्त नरेंद्र पाटील, बाळकृष्ण राऊत व अरुण पाटील यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंडळाचे अध्यक्ष तुषार राऊत, पदाधिकारी, सदस्य तसेच युवा समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सदस्य अर्चित सावे व कार्यवाह चैतन्य वर्तक यांनी केले. सरपंच सौ. प्रीती अरुण पाटील यांनी वृक्षारोपणासाठी आवश्यक रोपे उपलब्ध करून दिली. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षलागवड नव्हे, तर लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे हीदेखील काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले. समाजातील प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५ वृक्षांचे रोपण करून मंडळाने सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला. “एक झाड लावूया, वसुंधरेला सजवूया!” या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.