दहिसर - मथाणे येथील सोमवंशी क्षत्रिय समाजातील कु. अनुष्का बिपीन पाटील हिने वैमानिक (Pilot) प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची निवड आता Air India Express मध्ये झाली असून, समाजासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. कु. अनुष्काने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोरीवली येथील Mary Immaculate School मध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने अहमदाबाद येथील Blue Ray Aviation Flying School मधून वैमानिक प्रशिक्षण घेत सुमारे २०० तासांचे विमान उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. पुढे तिने Egypt मधील EgyptAir येथे दोन महिन्यांचे Type Rating प्रशिक्षणही पूर्ण केले. अनुष्काच्या यशाचा प्रवास मात्र खडतर राहिला. वैमानिक शिक्षण सुरू असतानाच कोरोना काळात तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. या कठीण प्रसंगामुळे न खचता तिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि यशाचे शिखर गाठले. तिच्या या यशामागे आईचे कष्ट, स्वर्गीय वडिलांचे संस्कार, आजी-आजोबांचे आशीर्वाद तसेच काका कुणाल पाटील व काकी सारिका पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ लाभले. कु. अनुष्का बिपीन पाटील हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिची ही यशोगाथा समाजातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरावी, अशी भावना व्यक्त होत आहे. कु. अनुष्काला तिच्या भावी वैमानिक कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!