पालघर जिल्ह्यातील चिंचणी (पाटील वाडा) येथील मातीत खेळत लहानाची मोठी झालेली आणि आपल्या अफाट क्रिकेट कौशल्याच्या जोरावर मैदानावर स्वतःचा ठसा उमटवणारी कु. शर्वी वैशाली सुहास सावे हिची २३ वर्षाखालील मुंबई महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी झालेली निवड ही निश्चितच चिंचणी गाव आणि पालघर जिल्ह्यासाठी अत्यंत कौतुकाची आणि अभिमानाची घटना आहे. शर्वीची ही यशोगाथा केवळ तिच्या प्रतिभेची नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम, सातत्य, आत्मविश्वास आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्याची प्रेरणादायी कहाणी आहे. शर्वीला खेळाचा वारसा घरातूनच लाभला. तिची आई वैशाली सावे या पालघर जिल्ह्यातील नामवंत कबड्डीपटू. आज त्या कबड्डी प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत, तर वडील सुहास सावे हे क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे खेळाविषयीची आवड, शिस्त, मेहनत आणि मैदानावर लढण्याची वृत्ती शर्वीच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच रुजली. मात्र केवळ वारसा असून यश मिळत नाही. त्यासाठी आवश्यक असतात कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि अपयशावर मात करण्याची जिद्द. शर्वीने आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या शालेय जीवनापासूनच क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरवात केली.कालांतराने मुंबईच्या युवा क्रिकेट संघांमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली.त्यामुळेच आज तिला मुंबईसारख्या बलाढ्य संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळवून दिला आहे. या यशामागे आई वैशाली आणि वडील सुहास यांचे सततचे प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक टप्प्यावर दिलेली साथ निश्चितच मोलाची आहे. त्याचबरोबर तिचे प्रशिक्षक, सहकारी आणि तिच्या क्रिकेट प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदानही तितकेच महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे. शर्वीचे यश ही आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देते.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुणवत्तेची अजिबात कमतरता नाही; कमतरता असते ती अनेकदा योग्य संधी आणि व्यासपीठाची. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात प्रचंड गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता आहे. शर्वीने आपल्या कर्तृत्वातून हे ठोसपणे सिद्ध केले आहे. आज शर्वी केवळ पालघरचं नाव उंचावलं नाही, तर ग्रामीण भागातील असंख्य मुलींसाठी ती एक प्रेरणादायी आदर्श आणि आशेचा किरण बनली आहे. योग्य संधी, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला तर ग्रामीण भागातील मुलीही मोठ्या व्यासपीठावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवू शकतात, हे शर्वीने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. तिच्याकडे असलेले उपजत क्रिकेट कौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघाला सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता यामुळे ती मुंबई महिला क्रिकेट संघाला निश्चितच एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील. शर्वी तुझे मनःपूर्वक अभिनंदन! तुझ्या सोबतच आई वैशाली, वडील सुहास,संपूर्ण सावे परिवार,तुझे प्रशिक्षक आणि तुझ्या या यशस्वी क्रिकेट प्रवासात साथ, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचेही मनःपूर्वक कौतुक! तुझ्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि मुंबई महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाच्या यशस्वी वाटचालीसाठी तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! चिंचणीच्या मातीतून सुरू झालेली तुझी ही प्रेरणादायी वाटचाल अशीच उंच उंच भरारी घेत राहो… आणि आपल्या चिंचणी गावाचे आणि पालघर जिल्ह्याचे नाव देशाच्या क्रिकेटच्या नकाशावर अधिकाधिक उजळत राहो!