विरार : CareerRaiser.in च्या संस्थापिका सौ. दीपा निकेत राऊत यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र स्टेट अचिव्हर अवॉर्ड – MSME डिजिटल आणि AI एक्सलन्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र MSME समिट अँड अवॉर्ड्स 2026 अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी तब्बल 2,500 नामांकने प्राप्त झाली होती. त्यापैकी विविध निकषांमध्ये पात्र ठरलेल्या केवळ 22 कंपन्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये विरार, पालघर येथील CareerRaiser.in चा समावेश होणे ही पालघर जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत आणि डॉ. पी. अंबालगन, भा.प्र.से., प्रधान सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. पी. वेलरासु, भा.प्र.से. (मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC), श्री. विकास पानसरे, IAS (व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC), कादंबरी बालकवडे, IAS (MIDC) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दशकभराच्या डिजिटल वाटचालीची दखल 2014 पासून CareerRaiser.in ने प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात कार्यरत राहून AI-assisted कंटेंट निर्मिती, ट्रेनिंग मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, AWS क्लाउड होस्टिंग आणि MSME इंडस्ट्री ऑटोमेशन यांसारख्या डिजिटल सुविधा विकसित केल्या आहेत. या डिजिटल कार्यप्रणालीमुळे कंपनीच्या कामकाजातील कार्यक्षमतेत 200 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. भारतासह परदेशातील विविध उद्योजक आणि लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी या डिजिटल सेवांचा लाभ झाला आहे. MSME, शेतकरी, शासकीय विभाग, महिला आणि युवा अशा विविध क्षेत्रांमध्ये CareerRaiser.in ने केलेल्या डिजिटल कार्याचीही या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. हा सन्मान CareerRaiser.in च्या संपूर्ण टीमच्या समर्पण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि डिजिटल नवोपक्रमाचे फलित असल्याचे संस्थापिका सौ. दीपा राऊत आणि श्री. निकेत कमळाकर राऊत यांनी सांगितले. या यशाबद्दल त्यांनी ग्राहक, भागीदार, शासकीय विभाग, हितचिंतक आणि समाजबांधवांचे विश्वास व पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.