सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाची रविवार दिनांक ८ डिसेंबर२०२४ रोजी झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत नविन व्यवस्थापक मंडळाची निवड होती या सभेत मागील व्यवस्थापक मंडळाला पुन्हा तीन वर्षासाठी संधी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आजची सभा अतिशय महत्त्वपूर्ण आणि विशेष ठरली. सभासदांनी समाजहितासाठी प्रगल्भता दाखवून सर्व विश्वस्तांनी एकमताने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांना ठामपणे पाठिंबा दिला. मान. श्री. भाईसाहेब राऊत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांची सन २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी पुनर्निवड करण्यात येत आहे ' असा ठराव रविवार दि ०८/१२/२०२४ रोजी विश्रामधाममध्ये आयोजित संघाच्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मान. डाॅ. श्री. दीपकभाई चौधरी यांनी मांडला आणि तो एक मताने मंजूर झाला. ही घटना खूप विचार करायला लावणारी आहे. आज प्रत्येक ज्ञातीतील एका शाखेतील पदाधिकाऱ्यांची निवडही खूप मोठी असते. त्यातून ५२ शाखांच्या मध्यवर्ती समाजातील निवड ही कधीच सोपी असणार नाही. भांडणे, गटबाजी, एकेरीवर येणे या गोष्टी अपेक्षित आणि सर्रास घडतात आणि त्याचे कोणाला आश्चर्यही वाटत नाही. पण आज सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाज शिक्षणात, नोकरी-व्यवसायात खूप प्रगत आहे. खरे तर ही प्रगती आर्थिक सुबत्ता वाढविते आणि परिणामतः ती अहंकार निर्माण करते. पुज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराच्या पुनर्विकासाचे कार्य अधिक प्रभावी व यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी, विरार शाखा आणि आगाशी शाखेने दिलेल्या पत्रांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून समाजहिताची भूमिका घेतली. तसेच संघ व ट्रस्टच्या विलीनीकरण प्रक्रियेस गती देण्यासाठी आणि घटनेतील आवश्यक बदल वेळेत पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची पुन्हा निवड करणे हा अत्यावश्यक आणि योग्य निर्णय होता. अशा पार्श्वभूमीवर या सभेत पदाधिकाऱ्यांची निवड होणार होती. अनेक सभासद त्यासाठी इच्छुक असणे स्वाभाविक होते. सभेला सुमारे १५०+ जण उपस्थित होते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात नक्कीच नामचीन होता. असे असताना कोणतीही खळखळ न करता अक्षरशः आनंदाने हात उंचावून ठराव एकमताने मंजूर झाला. सुसंस्कृतपणा यापेक्षा वेगळा असतो असे वाटत नाही. याचा अन्वयार्थ एवढाच निघतो की, आपला समाज ३० कोटींचा प्रकल्प नक्कीच वेळेत पूर्ण करील. आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास यापुढेही होत राहील. आपण असेच सजग राहिलो तर आपला समाज बहुजनसमाजात नक्कीच दीपस्तंभाची भूमिका बजावील. नवनिर्वाचित व्यवस्थापक मंडळाचे सर्व पदधिकाऱ्याचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील विधायक वाटचालीस अनेक अनेक अनेक शुभेच्छा ।