मनोगत प्रिय सोमवंशी क्षत्रिय समाज बंधुभगिनीनो, सविनय प्रणाम, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाने शतक संवस्तराची परिपूर्ति केल्यानंतर शतकातील संघाच्या घडामोडीचा आढावा घेणे अपरिहार्य होते. त्यास्तव 'सोमवंशम' या पुस्तकाव्दारे शतकपूर्वीच्या इतिहासाचे समाजबांधवांना दर्शन घडावे यासाठी अथक परिश्रमाने पुस्तकाची निर्मिती केली आहे. क्षत्रिय समाज रामायण, महाभारत काळापासून क्षात्रतेजाने तळपत राहीला आहे. तीच क्षत्रिय वृत्ती आपत्या समाजाने अनेक वर्षे अंगिकारली. आपला समाज क्षात्र वृत्तीने तत्कालीन प्रतापबिंब राजवटीत क्षात्रतेजाने तळपत होता. कालांतराने प्रतापबिंबाने महिकावती (माहिम) येथे राज्य हस्तगत करण्यासाठी स्वारी केली त्याच्या बरोबर आपली कुळे पैठणहून उत्तर कोकणात आली. त्या भागात डहाणूपासून वसई पर्यंत वसाहती केल्या. उत्तर कोकणचा हा भाग भातशेती व बागायत यासाठी प्रसिध्द होता. त्यामुळे आपल्या समाजाने क्षात्रवृत्ती ऐवजी कृषीबल (शेतकरी) ही व्यवसायिक वृत्ती स्विकारली. इतिहासाचा मागोवा घेताना समाजाने उत्तरोत्तर बहुसंख्य क्षेत्रात दैदीप्यमान प्रगती केली. 'सोमवंशम' ची रचना करताना असंख्य व्यक्तींचा व घटनांचा, समाजधुरिणांचा, त्यांच्या कर्तत्वाचा यथोचित गौरव करण्यात आला आहे. या पुस्तकासाठी अनेकांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. अर्थात सर्वार्थाने हे पुस्तक परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. पुस्तकात काही उणिवा असल्यास त्या समाजबांधवांनी समजून घ्याव्यात. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची मुहूर्तपेढ ज्या अध्वर्यू नेत्यांनी रोवली त्यांचे मी पुण्यस्मरण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस हे पुस्तक श्रध्दापूर्वक समर्पित करीत आहे. समाजबांधवांनी या पुस्तकाचे स्वागत करावे हीच अपेक्षा आपणच आपला उद्धार करावा या गीतेतील सूचानुसार समान वाटचाल करीत आहे. समाजाच्या भावी पिढीला शतकोत्तर प्रगतशील दर्शन व्हावे हा विश्वास. स्नेहांकीत, - नंदन पाटील सर