सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशीचा ४७ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी येथे संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. प्रिया सावंत - माजी प्राचार्य व युवा नेतृत्व विकास तज्ञ, विशेष अतिथी मान. श्री. अशोक राऊत- अध्यक्ष नुतन विद्या विकास मंडळ केळवे, आकाशवाणी केंद्राचे श्री भुपेंद्र मिस्त्री, पत्रकार श्री मनीष म्हात्रे आणि पत्रकार श्री राजेश राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्री. प्रफुल्ल दामोदर म्हात्रे, चिटणीस सो. क्ष. स. संघ, दादर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते 'अंकुर' या हस्तलिखिताच्या पाचव्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. सौ. प्रिया सावंत यांनी मुलांना कसे घडवावे आणि आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर दडपण न येता कसा त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करता येतील ह्याबाबत मार्गदर्शन केले. सध्या करिअरसाठी फक्त सायन्स आणि कॉमर्स हीच क्षेत्र मर्यादित राहिली नसून इतरही अनेक क्षेत्रात मुले प्रगती करू शकतात याकडे त्यांनी पालकांचे लक्ष वेधले. श्री. अशोक राऊत यांनी लहान मुलांना मार्गदर्शन करताना आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय कायम जमिनीवर असायला हवे आणि आपण आपल्या पालकांवर प्रेम केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे असा मोलाचा संदेश दिला. श्री. प्रफुल्ल म्हात्रे यांनी त्यांच्या काळातील मंडळाच्या आठवणी सांगून मंडळाच्या कार्याचा गौरव केला तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश म्हात्रे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले आणि मंडळाच्या कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे आणि स्पर्धकांच्या तसेच समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत असल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला ज्यात सेवानिवृत्त सदस्य, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आणि वार्षीक कला, क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितारणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले ज्यात म्हात्रेवाडी, कवळीआळी आणि उंबरगोठण या गावातील मुलामुलींनी आपली नृत्यकला सादर केली. सदर कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश राऊत, माजी उपाध्यक्ष केतन म्हात्रे, उपाध्यक्षा राजश्री म्हात्रे, कार्यवाह नूतन कवळी, कार्यवाह वृशाली राऊत, खजिनदार धवल म्हात्रे, मनीष राऊत, सुहास पाटील, किरण वर्तक, सुनील चुरी, पंकज चुरी, विहंग कवळी, चिन्मय पाटील, सुजाता कवळी, स्मिता वर्तक, संगीता म्हात्रे, श्रद्धा म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, आशिष म्हात्रे आदी उपस्थित होते.