सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी यांच्या वार्षिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पुरपाडा मैदान, आगाशी येथे संपन्न झाल्या. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मधुकर गोपाळ पाटील हे उपस्थित होते. श्री मधुकर पाटील हे आपल्या सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशी चे संस्थापक सदस्य (Founder Member) असून १९८० साली मंडळाच्या धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी स्वर्गीय अमृतबंधुंसोबत विशेष योगदान दिले. स्पर्धेच्या सुरवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि श्री. राजेश राऊत यांनी स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. मधुकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून, श्रीफळ फोडून स्पर्धेचे उदघाटन केले. मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. राजश्री मिलिंद म्हात्रे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आणि उपस्थितांना शपथ दिली आणि स्पर्धांना सुरुवात झाली. वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, लंगडधाव, चेंडुफेक, गोळाफेक, थाळी फेक, लांब उडी, रायफल शूटिंग इत्यादी खेळांचा समावेश होता. स्पर्धेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानी हिरीरीने भाग घेतला आणि स्पर्धा यशस्वी केल्या.